उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा; जाहीर सभेवरुन शिवसेनेत मतभेद ?
संजय राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. सोमवारी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. मंगळवारी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. राम नाईक यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेला या सभेसाठी परवानगी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
संजय राऊत यांना काय वाटते?
संजय राऊत यांच्या मते उद्धव ठाकरे यांनी अयोध्य रामललाचे दर्शन घ्यावे आणि नंतर हिंदू धर्मगुरुंची भेट घ्यावी. या ठिकाणी सभा घेणे कठीण असल्याचे राऊत यांचे मत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
एकनाथ शिंदेना काय वाटते?
अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी, असे एकनाथ शिंदे यांना वाटते. सभेसाठी एकनाथ शिंदे राज्यातील शिवसैनिकांनाही अयोध्येत नेण्याचे नियोजन करत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
सभेचा तिढा काय?
अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यास अन्य हिंदुत्ववादी संघटनाही अयोध्येत जाहीर सभेसाठी परवानगी मागतील, असे प्रशासनाला वाटते. त्यामुळे सभेला सशर्त परवानगी मिळेल, असे सांगितले जाते.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक
उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत संध्याकाळी सव्वा पाच वाजता आरती करतील. याआधी ते लक्ष्मण किला येथे जातील. तिथे हिंदू धर्मगुरुंची भेट घेतील. २५ नोव्हेंबर रोजी ते राजजन्मभूमीला भेट देतील. यानंतर पत्रकार परिषद आणि दुपारी एक वाजता जाहीर सभा घेतील.