इंडो ॲथलेटिक्सने ‘पुणे-अलिबाग-पुणे’ सायकल फेरीचे आयोजन; पर्यावरण रक्षणाचा संदेश
![Pune Alibaug Pune cycle rally PCMC Environment protection](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Pune-Alibaug-Pune-cycle-rally-PCMC-Environment-protection.jpg)
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने निरोगी आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ‘पुणे-अलिबाग-पुणे’ अशी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.
निर्माण ग्रूपचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रावेत येथील मुकाई चौकातून या फेरीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ.सुहास माटे, उद्योजक अण्णा बिरादार, अग्रसेन किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए के.एल बंसल, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, उपाध्यक्ष अजित पाटील, सचिव गणेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या फेरीमध्ये पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, संगमनेर या शहरातील सुमारे १५० सायकलपट्टू सहभागी झाले होते.किवळे-लोणावळा-खोपोली-पनवेल-पेण-रेवदंडा (अलिबाग) या मार्गाने हि सायकल फेरी काढण्यात आली.
इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे १२ हजार सदस्य आहे. २०१६ पासून वर्षभरातून सायकलवरुन पंढरपूर वारी, भक्ती-शक्ती सायक्लोथॉन, घोरावडेश्वर हाइक ॲंड बाईक, बाईक टू वर्क असे उपक्रम राबविले जातात, अशी माहिती आयोजकांनी दिली.
सुनील आगरवाल म्हणाले कि, निर्माण समूहाने प्रदूषण कमी होण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी “निर्माण ग्रीन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांर्गत या सायकल फेरीस निर्माण समूहाने सहकार्य केले आहे.