विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीड येथे होणार अंत्यसंस्कार
![Vinayak Mete : विनायकराव मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीड येथे होणार अंत्यसंस्कार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Vinayak-Mete-विनायकराव-मेटेंच्या-पार्थिवावर-उद्या-बीड-येथे-होणार.jpg)
बीड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचे पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसल्याने बीड जिल्ह्यातील अजून एक राजकारणातला दर्दी नेता हरवल्याने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मेटेंच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. “शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.