Uncategorizedताज्या घडामोडी

पोलादपूरमधील ‘ही’ गावे भितीच्या छायेत; भूगर्भशास्त्नज्ञांनी केली पाहणी; राष्ट्रीय महामार्ग बांधकाम प्राधिकरण जबाबदार !

पोलादपूर: कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर हद्दीत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील चोळई, बावणे, धामणदेवी अशा गावातील लोकांना सुरक्षेचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान आज बुधवारी मौजे चोळई आणि धामणदिवी येथील दरड कोसळलेल्या परिसरात भेट देऊन वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. आता या पाहणी नंतर भूगर्भशास्त्रज्ञ आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हायवेच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामानंतर कशेडी घाटाखाली असलेल्या गावांना मोठया दरडींचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, बुधवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

धामणदेवी येथील १९ घरांमधील सुमारे ६२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यातील मंगळवारी ५ जुलै रोजी ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुडलवाड, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई तर महाड तहसीलदार सुरेश काशीद, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे व सगळ्या प्रशासकीय यंत्रणा समन्वय साधून अलर्ट मोडवर आहेत.

कशेडी घाटाला यंदा चौपदरीकरणाच्या कामाचा गंभीर परिणाम जाणवायला लागलल्याचे जवळपास स्पष्ट आहे. धामणदेवी गाव हद्दीत डोंगर भागाची होत असलेली कटिंग चुकीच्या पद्धतीने केले असल्यामुळे संततधार पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन दरड खाली येण्याची शक्यता असतानाच मंगळवारी मातीचा मोठा भाग खाली आला. त्यामुळे धामणदेवी ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. या वस्तीना थेट कोणता धोका नसला तरी हायवेवर येणारे मातीचे ढीग, दरडी यामुळे सुरक्षेसाठी या गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी तीन वेळा दरडीचा मोठा ढिगारा दगड मातीसह खाली आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे १८ तास ठप्प झाली होती यादरम्यान वाहतूक तुळशीखिंड विन्हेरे महाड मार्गे वळवण्यात आली होती तर येथील डोंगराचा ढिगारा खाली आल्यानंतर दगड माती शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाच शेतकऱ्यांची शेती बाधित झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

गतवर्षी या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी महामार्ग कशेडी घाटाची पाहणी करून घाटातील काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना अभियंते व प्रशासनाला दिल्या होत्या. दरम्यान धामणदेवी ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम पारदूळे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दरड येण्याच्या धोका वर्तवला होता. तरीही याकडे संबंधित ठेकेदार कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष केल्याचे या सगळ्या रत्नागिरी रायगड जिल्हयात महामार्गावर घडत असलेल्या घटनांमुळे अधोरेखित झाले आहे.

त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ आणि जिल्हा खनिकर्म आता कोणता अहवाल देतात व उद्भवलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करुन या भौगोलिक स्थितीबद्दल अंदाज व कोणत्या उपाययोजना सुचवतात कींवा कसे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button