breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विश्वजीत कदमांच्या विधानामुळे मविआत पुन्हा पेच; जयंत पाटलांचाही तीन जागांवर दावा!

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चर्चेतल्या मतदारसंघांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. सांगलीत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात जागेवरून झालेली खडाजंगी आणि त्यापाठोपाठ विशाल पाटील यांनी केलेली बंडखोरी यामुळे यंदाची सागली लोकसभा निवडणूक चर्चेत होती. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि सांगलीतील ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील व महायुतीचे उमेदवार या दोघांचा त्यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकांनंतर या वादावर पडदा पडल्याचं वाटत असतानाच आता विधानसभा निवडणुकांमध्येही सांगलीचा सुरुंग महाविकास आघाडीत पेच निर्माण करण्याची शक्यता आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघावर विश्वजीत कदम यांनी आधीच दावा केला होता. त्यानुसार विशाल पाटील यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र सांगलीतील ठाकरे गटाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जागावाटप जाहीर होण्याच्या आधीच चंद्रहार पाटील सांगलीतून मविआचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी जाहीरपणे ती बोलूनही दाखवली. पण आघाडीधर्म पाळण्यासाठी यंदा आग्रह सोडतो असं सांगत विश्वजीत कदमांनी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. भाजपाचे संजय काका पाटील यांचा १ ला ५३ हजार मतांनी तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा तब्बल ५ लाख १० हजार ८०६ मतांनी त्यांनी पराभव केला. या विजयानंतर विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्यासोबत विजयाची संयुक्त पत्रकार परिषद घेतली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हेही वाचा  –  ‘NDA सरकार कधीही कोसळू शकतं’; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान 

सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पण यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांवर विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या वतीने दावा सांगितला आहे. शुक्रवारी रात्री विशाल पाटील यांच्यासाठी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. “कुणी काहीही बोलो, या जिल्ह्यात ४ किंवा ५ जागांवर काँग्रेस पक्ष १०० टक्के लढणार. त्या जिंकून आणणार. हा आमचा निश्चय आहे. अंतर्गत काही प्रश्न आहेत. ते नक्कीच विचारार्थ घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत काय त्रास सोसावा लागला हे आमचं आम्हाला माहिती. किती संघर्ष करावा लागला हे आमचं आम्हाला माहिती. काही गोष्टी मला जास्त सोसाव्या लागल्या. आणि काही गोष्टी उमेदवार म्हणून विश्वास पाटलांनाही जास्त सोसाव्या लागल्या”, असं ते म्हणाले. पण यावेळी त्यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेनं होता, यावर आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

“मी एक माणूस लोकसभेत पाठवला आहे, तसंच या जिल्ह्यातून एक काय, दोन आमदार इथून विधानसभेवर पाठवण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त वातावरण खराब होईल असं काही करू नका. खडा टाकणारी माणसं बरीच आहे. ज्यांनी खडे टाकायचे प्रयत्न केले, त्यांना त्यांची जागा लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे. पुन्हा ते खडे टाकायची हिंमत करणार नाहीत”, असं सूचक विधानही विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

दरम्यान, एकीकडे विश्वजीत कदम यांनी सांगलीतल्या पाच जागांवर लढण्याची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही या मतदारसंघातल्या किमान ३ ते ४ जागा लढण्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. “सांगलीतल्या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या येतील. अजून एखादी जागा आपल्याला मिळवायची आहे”, असं जयंत पाटील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले.

सांगलीमुळे लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा पाहायला मिळाली. आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा विश्वजीत कदम आणि जयंत पाटील यांच्या दाव्यांमुळे सांगली राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button