breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

करोना काळात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

मुंबई |

करोनाच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली तसेच जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे. ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातून ही बाब स्पष्ट झाली असून प्रामुख्याने भारतासह विकसनशील देशात गर्भवती महिलांचे करोना काळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे लॅन्सेट’मधील प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे. महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे जास्त मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. एकूण १७ देशात ४० अभ्यासगटांनी याबाबत गोळा केलेल्या तपशीलातून करोना काळातील गर्भवती महिलांचे करोना काळातील जास्त मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बुधवारी लॅन्सेट मधून ही बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. करोनाबाधित गर्भवती महिला तसेच वेगवेगळ्या संसर्गाने आजारी असलेल्या महिला, त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात आलेले अडथळे या सर्वांचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे.

१७ देशातील जवळपास सहा लाख गर्भवती महिलांची माहिती घेऊन तपशीलवार छाननी करण्यात आली. यात अभ्यासकांना प्रामुख्याने अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात आरोग्य व्यवस्थेत करोनामुळे निर्माण झालेल्या उपचारातील अडचणी तसेच संसर्गाच्या भीतीमुळे अनेक गर्भवती महिलांचे तसेच अर्भक जन्मत: मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. जवळपास बाराहून अधिक अभ्यासात जन्मताच अर्भक मरण पावल्याच्या प्रमाणात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले, तर गर्भवती असताना तसेच बाळंतपणाच्या काळात मेक्सिको व भारतात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तसेच गर्भरपणाच्या काळात आणि बाळंतपणानंतर नैराश्य व चिंताग्रस्त होण्याचे महिलांमधील प्रमाण वाढल्याचे लेखात नमूद केले आहे. बाळाची वाढ गर्भाशयाच्या बाहेर झाल्यामुळे कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेच्या प्रमाणात सहापट वाढ झाली आहे. एकूणच विकसित व विकसनशील देशात गर्भवती महिलांवर करोनाचे वेगवेगळे परिणाम झालेले पाहायला मिळाल्याचेही या लेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे २० लाखा बाळांचा जन्म होत असतो. यातील जवळपास आठ लाख बाळांचा जन्म हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात होतो तर चार लाख बाळांचा जन्म नगरपालिका – महापालिका रुग्णालयात होतो. याशिवाय आठ लाख बाळांचा जन्म हा खासगी रुग्णालयात होत असतो. गेल्या महिन्यात ‘युनिसेफ’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास राज्यात पहिल्या टप्प्यात करोना वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार गर्भवती महिला व नवजात बालकांची करोना काळात विशेष काळजी घेण्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्येष्ठ डॉक्टरांची एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार गर्भवती महिलांची जास्तीतजास्त काळजी घेण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. तरीही करोना काळात आमच्या अनेक जिल्हा रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याचा परिणाम काही ठिकाणी झाला असण्याची शक्यता असल्याचे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

एरवी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गर्भवती महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी, लोहाच्या गोळ्या पुरवणे तसेच विविध चाचण्यांसाठी ‘आशा’ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणारा पाठपुराव्यावर काही प्रमाणात परिणाम झाला. बहुतेक आशा या करोनाच्या वेगवेगळ्या कामात गुंतल्या असल्या तरी गर्भवती महिलांच्या आरोग्याचा त्यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता असेही डॉ. पाटील म्हणाल्या. काही जिल्ह्यात जेथे करोनाबाधितांचे प्रमाण जास्त होते तेथे काही परिणाम झाला असेल तथापि याबाबतची आकडेवारी आजघडीला उपलब्ध होणे कठीण असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रात करोना वाढू लागताच गर्भवती महिला, बालआरोग्य तसेच लसीकरणासह आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंमलबजाणीचाही नियमित आढावा घेऊन योग्य ती काळजी घेण्यास संबंधितांना सांगितले जात होते, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. तसेच करोना वाढीच्या काळात अनेक जिल्हा रुग्णालये तसेच अन्य रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याचे काही परिणाम आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांवर झाल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले. गर्भवती महिला व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित महापालिकांनाही सूचना दिल्या होत्या. आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयांची मदत घेण्यासही सांगण्यात आले होते तथापि काही परिणाम निश्चित झाला असणार असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button