breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात आगसत्र सुरू, एका रात्रीत तीन ठिकाणी अग्नितांडव

मुंबई – भांडुपच्या ड्रीम मॉल मध्ये आग लागून काल 11 जणांचा जीव गेला. त्यानंतर मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात आग लागण्याचे सत्र सुरू झाले. ड्रीम मॉलला आग लागल्यानंतर आज प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली. तसेच बदलापूर आणि अंबरनाथ मध्येेेही आगीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय पुण्याच्या फॅशन स्ट्रीट मध्ये लागलेली आगही भीषण आहे.

मुंबईच्या प्रभादेवीत मोठी आग

मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत 12 अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. मात्र या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

वाचा :-पुण्यात अग्नितांडव! फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये 448 दुकाने जळून खाक

बदलापुरात बंद कंपनीला भीषण आग

बदलापुरात एका बंद केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत असलेल्या ईस्टर इंडिया या कंपनीला आग लागली आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण 9 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी 6 वाजता ही आग नियंत्रणात आली.आग लागलेली कंपनी मागील 3 महिन्यांपासून बंद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून कंपनी मात्र संपूर्णपणे जळून खाक झालीये.

अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन सोसायटीला आग

अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन्स या उच्चभ्रू सोसायटीत बिल्डरने ठेवलेल्या बांधकाम साहित्याला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बांधकाम साहित्य जळून खाक झालं.या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र यावेळी सोसायटीची अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याचं अग्निशमन दलाच्या लक्षात आलं. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले. अखेर एमआयडीसी अग्निशमन दलाची मदत मागवून ही आग विझवण्यात आली. या सोसायटीत १८ मजल्याच्या इमारती असून तितक्या उंच शिड्या अग्निशमन दलाकडे नसल्यानं या सोसायटीत अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र ही यंत्रणा अशा दुर्घटनांच्या वेळीच बंद असेल, तर तिचा काय उपयोग? असा सवाल यानंतर उपस्थित झालाय. दरम्यान, एकीकडे भांडुपची घटना ताजी असतानाच आता मोठ्या रहिवासी सोसायट्यांच्या फायर सेफ्टीचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. या सोसायट्यांना फायर एनओसी कुठल्या आधारावर दिली जाते? आणि अग्निरोधक यंत्रणांची तपासणी होते का? त्या यंत्रणा बंद असतील तर सोसायट्यांवर कारवाई होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button