शिक्षण विश्व: सायबर गुन्हेगारीविरोधात जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पुढाकार!
प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेचे महत्व अधोरेखित
पिंपरी- चिंचवड : सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड यांच्यातर्फे “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत एक विशेष जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली. क्विक हील फाउंडेशन आणि सायबर जनजागृती अभियान संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत प्रतिभा महाविद्यालयाचे विद्यार्थी निगडी परिसरात गेले व त्यांनी सामान्य नागरिकांसोबतच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनाही सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देऊन त्यांच्यात जनजागृती केली. सायबर गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांकडूनही यावेळी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.
या अभियानात सायबर सुरक्षेसंदर्भात पुढील गोष्टींवर विशेष भर देण्यात आला :
1. बनावट कॉल्स आणि ईमेलद्वारे होणारी फसवणूक
2. अज्ञात लिंकवर क्लिक केल्यामुळे होणारे संभाव्य धोके
3. ओटीपी आणि पासवर्ड शेअर करताना घ्यायची काळजी
4. सोशल मीडिया वापरातील सुरक्षितता
ही माहिती नागरिकांना सुलभ भाषेत देण्यात आली, जेणेकरून ते सहजपणे याचे पालन करू शकतील. मानसी वाडेकर व श्रावणी सावंत या विद्यार्थिनींनी प्रभावीपणे माहिती सादर केली. या उपक्रमात प्रकल्प समन्वयक डॉ. हर्षिता वाच्छानी, क्विक हील फाउंडेशनचे सीएसआर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर व दिपू सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी अशी जनजागृती मोहीम अत्यंत उपयुक्त ठरत असून, पुढील काळातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.




