breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालखी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची योग्य खबरदारी घ्या; आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचना

पिंपरी : आषाढीवारी २०२४ च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी महापालिकेच्या वतीने सूक्ष्म नियोजन करावे. पालखी मार्गामध्ये वारकऱ्यांना गैरसोय होणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, अण्णा बोदडे,  रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ.अंकुश जाधव, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे शहर परिसरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

आयुक्त शेखर सिंह यांनी आषाढीवारी पालखीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. त्यामध्ये पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाने आवश्यक ठिकाणी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी, पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करुन खड्डे बुजविण्यात यावेत, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पार्कीगच्या जागी पार्कींग संदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या सुविधां संदर्भातील फलक लावण्यात यावेत, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रुम उभारावी, महापालिका हद्दीतील पालखी प्रवास मार्गाचा नकाशा तयार करावा आणि त्यामध्ये प्रत्येक २०० मीटर अंतराच्या नियोजनाच्या दृष्टीने नियंत्रीत आराखडा तयार करण्यात यावा, पालखी मार्गावरील रस्त्यांचे काम चालू असल्यास त्या ठिकाणी पक्के बॅरिकेट्स उभारण्यात यावेत, पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावेत, पालखीच्या मार्गावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी आदी  सूचनांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून मुक्कामाच्या ठिकाणी रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पालखीच्या मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र फिरते शौचालय आदी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button