TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करा

पुणे : गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रम स्थगित करण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभ्यासकांसह विद्यापीठाच्या विविध विभागांतील २५हून अधिक प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाबाबत आक्षेप नोंदवणारे संयुक्त निवेदन कुलगुरूंना दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत-प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमावर टीका करण्यात आल्यानंतर विद्यापीठाने अभ्यासकांना अभ्यासक्रमाबाबत सूचना करण्याचे आवाहन करत अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील प्राध्यापकांनी अभ्यास – क्रमाबाबत काही प्रश्न उपस्थित करून अभ्यासक्रम स्थगित करण्याची मागणी कुलगुरूंकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली.

अभ्यासक्रमाला मान्यता देताना या विषयाची चर्चा संबंधित विषयतज्ज्ञांचा समावेश असलेल्या विद्याशाखा, विद्या परिषद या महत्त्वाच्या अधिकार मंडळांमध्ये झाली नाही. महाराष्ट्र विधिमंडळाने विद्यापीठ स्थापनेच्या वेळी स्पष्ट केलेल्या उद्देशांपैकी कोणता उद्देश या अभ्यास – क्रमाद्वारे साध्य होतो हे स्पष्ट होत नाही. धर्मविषयक ग्रंथ, प्राचीन भाषा आणि साहित्याचा अभ्यास विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये चिकित्सक आणि तर्कनिष्ठ पद्धतीने केला जातो. या अभ्यासाला शास्त्रीय संशोधन आणि अभ्यासाचे अधिष्ठान असते. मात्र हा प्रमाणपत्र कोणत्याही पूर्व संशोधनावर, शास्त्रीय निकषांवर आधारित आहे का, या अभ्यासक्रमाची मांडणी आणि अध्यापन शास्त्रीय पद्धतीने केले जाते का, याबाबत शंका वाटते.

अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने निश्चित मन:शांती मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो हे कोणत्या ठोस वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे निश्चित केले हे स्पष्ट होत नाही. अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकात दिलेल्या एकविसाव्या ध्वनिचित्रफितीमध्ये सांगितल्याप्रमाणे ‘अशिष्य व्यक्तीला अथर्वशीर्ष शिकवले असता पाप लागते, आठ ब्राह्मणांना स्तोत्र शिकवावे म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा अथर्व होतो,’ अशी विधाने केली आहे. अशा विधानांद्वारे समाजात विषमतेचा पुरस्कार आणि अंधश्रद्धांचा प्रसार विद्यापीठाचे नाव घेऊन केला जात आहे, त्याला समाजमान्यता मिळवण्याचा प्रयत्न होत आहे हे योग्य नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या मुद्द्यांबाबत तज्ज्ञांमार्फत चौकशी करून ती सार्वजनिक करण्याची, चौकशी पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button