महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : विंडीज-आफ्रिकेला समान गुण; भारताला मोठा विजय आवश्यक
![Women's World Cup: Equal points for West Indies-Africa; India needs a big win](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/India_Won-1.webp)
पीटीआय, वेलिंग्टन | ‘आयसीसी’ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला. साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दक्षिण आफ्रिका व विंडीज या दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात आले. भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत मोठय़ा फरकाने विजय आवश्यक आहे.
पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही, तरी एक गुण भारताच्या पथ्यावर पडू शकतो. कारण, विंडीजपेक्षा भारताची निव्वळ धावगती सरस आहे. विंडीजचे सर्व सामने झाले असून ते रविवारी होणाऱ्या लढतीत आफ्रिकेचा संघ जिंकावा अशी प्रार्थना करतील. भारताने आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी तीन विजय मिळवत एकूण सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थान राखले आहे. भारताने पाकिस्तान, विंडीज आणि बांगलादेशला हरवले आहे.
भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण
१. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के होऊ शकते.
२. हा सामना रद्द झाल्यास भारत हा वेस्ट इंडिजपेक्षा सरस निव्वळ धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीसाठी पात्र होईल.
३. हा सामना गमावल्यास इंग्लंड आणि बांगलादेश लढतीकडे भारताचे लक्ष असेल. या लढतीत बांगलादेशने इंग्लंडला मोठय़ा फरकाने पराभूत केले तरच भारताला फायदा मिळू शकतो.