“2027 चा वर्ल्डकप खेळायचाय म्हणून टी-20 मधून निवृत्ती”
मिचेल स्टार्कने चाहत्यांना दिला धक्का

मुंबई : 20 वर्ल्डकप विजेता आणि ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यासाठी आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्टार्कने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या अचानक निर्णयामुळे क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टी-20 मधून निवृत्तीची घोषणा
35 वर्षीय मिचेल स्टार्कने 65 टी-20 सामने खेळले असून, त्यात त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. 2021 मध्ये यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो एक महत्वाचा भाग होता. 2024 मध्ये कॅरिबियनमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमधील सामना त्याचा या फॉरमॅटमधील शेवटचा सामना ठरला.
“कसोटी क्रिकेट ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि नेहमीच राहिली आहे,” असं स्टार्कने निवृत्तीवेळी म्हटलं. “2027 मध्ये होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकांसाठी मला पूर्णपणे ताजेतवाने आणि तंदुरुस्त राहायचं आहे. त्यामुळे टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणं हा सर्वोत्तम मार्ग आहे,” असेही त्याने स्पष्ट केले.
2027 वर्ल्डकप आणि कसोटी मालिकांवर लक्ष
2026 च्या मध्यापासून ऑस्ट्रेलियाचा कसोटी वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. यात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका असून, जानेवारी 2027 मध्ये भारत दौऱ्यावर पाच कसोटींची मालिका आणि त्यानंतर अॅशेस मालिकाही होणार आहे.
2027 चा एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाने 2023 चा वर्ल्डकप जिंकल्यामुळे, ते सध्याचे विजेते म्हणून या स्पर्धेत उतरतील.
टी-20 मधील प्रभावशाली कारकीर्द
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 20 धावांत 4 बळी घेत त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनीही त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं. “तो 2021 च्या विजेता संघाचा अविभाज्य भाग होता. विकेट घेण्याच्या क्षमतेने त्याने अनेक डावांचं चित्र बदललं,” असं बेली म्हणाले.
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 संघ जाहीर
ऑस्ट्रेलियन संघाने ऑक्टोबरच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका जाहीर केली आहे. मिचेल स्टार्कची ही निवृत्ती जाहीर झाल्यानंतर, पुढील काही खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. कॅमेरॉन ग्रीन व नॅथन एलिस अनुपस्थित राहतील. मॅट शॉर्ट आणि मिशेल ओवेन संघात पुनरागमन करत आहेत.