सामान्य कुटुंबातील मुलाचा जिद्दीच्या जोरावर सायकलीने सात हजार किलोमीटर प्रवास
गरीब कुटुंबातील तरुणाची प्रेरणादायी कहाणी
![Ordinary, family, stubborn, bicycle, seven, kilometers, travel, poor, family, youth, inspirational, story,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/sawala-780x470.jpg)
संग्रामपूर : तालुक्यातील सावळा (गट ग्रामपंचायत मारोड) येथील सामान्य कुटुंबातील एका तरूण मुलाने जिद्दीच्या जोरावर सायकलीने सात हजार किलोमीटर प्रवास करीत रामेश्वरम गाठले. तब्बल चार महिने तो सायकलीने प्रवास करीत निघाला होता. तरुणाच्या मनगटात कुठलेही ध्येय गाठण्याची ताकद असते. यासाठी त्याचे प्रयत्न, जिद्द, धाडस मात्र हवे असते.
सावळा येथील दत्ता पुंजाजी पूरकर या ध्येयवेड्या तरुणाने असामान्य कामगिरी बजावत ‘संपुर्ण भारत यात्रे’ अंतर्गत चक्क सायकलीने प्रवास करीत दक्षिण भारताचे थेट शेवटचे टोक गाठले. दत्ता हा एका छोट्याशा गावात राहणारा तरुण. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. आईवडील मजुरी करून कुटुंबाची गरज भागवतात. दत्ता हा फोटोग्राफीचे काम करतो. लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आणि जग पाहण्याची इच्छा त्याच्या इच्छा भरलेली आहे. पैशांअभावी त्याच्या इच्छा पुर्ण करण्याच्या स्वप्नांवर मर्यादा होत्या.
मात्र, पुरेसा पैसा नसला म्हणून इच्छा थोडेच मारायच्या असतात. दत्तानेही तेच केले. त्याने चार महिन्यापुर्वी सायकल काढली आणि निघाला भारत भ्रमंतीवर. नुकताच तो भारताचे दक्षिण टोक असलेल्या रामेश्वरम येथे पोचला. या सुवर्ण क्षणाचा एक व्हीडीओ त्याने शेअर करीत आनंद व्यक्त केला. आतापर्यंत सायकलवर त्याने सात हजार किलोमीटरचा प्रवास पुर्ण केल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ
या प्रवासाला निघण्यापुर्वी त्याने सायकल तसेच पैसे व साहित्याची जुळवाजुळव केली. प्रवास करताना लागणारी राहुटी, खाण्यापिण्याचे, झोपण्यासाठीचे साहित्य, सायकलीचे नेहमी गरज भासणारे विविध पार्ट सोबत घेत त्याने सायकलीच पायडल मारले.
दत्ताने चार महिन्यांपुर्वी प्रवासाला सुरुवात केली. मजलदरमजल करीत हो येथपर्यंत पोचला. प्रवासादरम्यान दत्ताला काही ठिकाणी अडचणींना सामोरेही जावे लागले. पण त्याने माघार घेतली नाही. जेथे जागा मिळेल तेथे तो रात्रीचा मुक्काम करतो. दुसऱ्या दिवशी प्रवासाला लागायचा.
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने फक्त निसर्गच नाही, तर माणसेही अनुभवली. जिद्द, स्वप्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर दत्ताला या प्रवासाने मोठा आनंद दिला आहे. या प्रवासाने त्याला केवळ स्वतःच्या गावातच नाही, तर अनेकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले आहे. त्याची ही गोष्ट आज अनेकांना प्रेरणादायी वाटू लागली आहे.