पुतिनच्या सभेतील सहभागी ऑलिम्पिकपटू अडचणीत
![Olympians attending Putin's rally in trouble](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/sp2-olympic.jpg)
एपी, लंडन | राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी आयोजित प्रचारसभेत सहभागी झालेले रशियन ऑलिम्पिकपटू अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या समर्थनार्थ गेल्या शुक्रवारी मॉस्को येथील लुझनिकी स्टेडियममध्ये एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. तसेच पुतिन यांनी भाषणही केले. या प्रचारसभेत सहभागी झालेला रशियन जलतरणपटू एव्हगेनी रेलोव्हची जागतिक जलतरण संघटनेकडून (फिना) चौकशी होणार आहे. तसेच ‘स्पीडो’ या जलतरणाचे कपडे तयार करणाऱ्या कंपनीने रेलोव्हसोबतचा करार तात्काळ रद्द केला आहे.
रेलोव्हसह फिगर स्केटिंगपटू व्हिक्टोरिया सिनित्सिना, निकिता कात्सालापोव्ह, एव्हगेनीया तारासोव्हा आणि व्हादिमीर मोरोझोव्ह, स्कीइंगपटू अलेक्झांडर बोल्शूनोव्ह आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्सपटू डिना व अरिना या अव्हेरीया भगिनी हे रशियन ऑलिम्पिकपटू पुतिन यांच्या प्रचारसभेत उपस्थित होते. रशियन राष्ट्रगीत सुरू असताना हे सर्व खेळाडू रंगमंचावर उभे राहिले.