आता भारत-न्यूझीलंड लॉर्ड्सवर आमनेसामने
![Now India-New Zealand face off at Lord's](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Lords-cric.jpg)
अहमदाबाद – इंग्लंड विरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता इंग्लडच्या लॉर्ड्स मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता होणार आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जून २०२१ रोजी सुरू होणार आहे. मात्र कोरोना संकटाच्या सतत बदलत्या स्थितीवर आयसीसी लक्ष ठेवून आहे. त्यानुसार कोणत्याही कारणामुळे आवश्यकता भासल्यास अंतिम सामन्याचे वेळापत्रक योग्य वेळी बदल करून जाहीर केले जाईल आणि जर बदल झाला नाही तर ठरल्याप्रमाणे सामना होईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. यामुळे आयसीसी कसोटी क्रिकेट संघांच्या क्रमवारीत तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर दोन्ही याद्यांमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे.