#LockDownमध्ये पाक क्रिकेटपटूंनी खेळला सामना, रियाझ होता कर्णधार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Pakistan-Logo.jpg)
जगभरात करोना व्हायरसचे थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडा, असे सरकारने सांगितले आहे. पण पाकिस्तानमध्ये तर लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट खेळले गेले आणि यामध्ये पाकिस्तानचावेगवान गोलंदाज वहाब रियाझ कर्णधार असल्याचे पाहायला मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे आता क्रिकेट स्पर्धा कधी सुरु होणार, याचे उत्तर कोणाकडेही नाही. सध्याच्या घडीला बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दौऱ्याबाबत काही गोष्टी सुरु आहेत. पण यंदाचा ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या वर्षी आयपीएल खेळवले जाणार की नाही, यावरही मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला परिस्थिती सामान्य होईपर्यंत कुठलीही क्रिकेट स्पर्धा होईल, असे वाटत नाही. पण पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनच्या काळात कसा सामना खेळला गेला, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
लॉकडाऊनच्या काळात क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतामध्ये लॉकडाऊनमुळे खेळाडू घरातच आहेत. त्यांना सराव करायलाही मिळत नाहीए. या लॉकडाऊनच्या काळात पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळल्याचे समजत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ यावेळी कर्णधार होता. या सामन्यात गोलंदाजी करत होता तो हसन अली. लॉकडाऊनच्या काळात पाकिस्तानमध्ये या खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली तरी कोणी, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. हा क्रिकेटचा सामना कुठे खेळवला गेला आणि यावेळी कोण कोण उपस्थित होते, हे प्रश्नही पडायला लागले आहेत. पाकिस्तनचा क्रिकेटपटू शान मसूद याने ही गोष्ट सांगितली आहे. या सामन्याला संघातील काही खेळाडू उपस्थित होते. रात्रीच्यावेळी शान हा चॅटींग करत होता, त्यावेळी मध्येच कोणी तर बॉल त्याच्या दिशेने फेकला. शानला यावेळी ऑनलाईन क्रिकेट खेळण्याची कल्पना सुचली. शानने हेल्मेट घालून बॅटींग केली आणि हसन अलीने त्याला गोलंदाजी केली. हा सामना पाकिस्तानच्या काही खेळाडूंमध्ये ऑनलाईन पद्धतीने खेळला गेला.