breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकातावर ‘विराट’ विजय

अबुधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहज मोठा विजय मिळवला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक आणि भेदक मारा केल्याने कोलकाताच्या फलंदाजांनी त्यांच्यापुढे अक्षरश: लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच कोलकाताला बंगळुरूपुढे केवळ ८५ धावांचे आव्हान ठेवता आले. बंगळुरूच्या फलंदाजांनी हे आव्हान 14व्या षटकातच आठ गडी राखून सहज पार केले. बंगळुरूचा या हंगामातील हा सातवा विजय आहे. यासह हा संघ मुंबई इंडियन्सला मागे सारून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताची अत्यंत खराब सुरुवात झाली. दुसर्‍याच षटकात सलामीवीर राहुल त्रिपाठी बाद झाला. तर पुढच्या चेंडूवर नितीश राणाही खाते न उघडताच माघारी परतला. यानंतर तिसऱ्या षटकात नवदीप सैनीच्या चेंडूवर शुभमन गिलही अवघ्या एका धावेवर झेलबाद झाला. अशाप्रकारे कोलकाताने त्यांचे तीन फलंदाज केवळ तीन धावांमध्ये गमावले. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या टॉम बँटनने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र तोही 10 धावा करून सिराजच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताला 20 षटकात 8 बाद 84 धावाच करता आल्या. सिराजने केवळ आठ धावांत तीन विकेट्स घेतले. तर चहलनेही दोन विकेट्स काढून त्याला चांगली साथ दिली.

तसेच कोलकाताच्या ८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी एकही विकेट न गमावता ४४ धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतर सातव्या षटकात बंगळुरूला दोन धक्के बसले. ल्युकी फर्ग्युसनने यावेळी सलामीवीर आरोन फिंचला बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. या षटकातच बंगळुरूला दुसराही धक्का बसला. कारण त्यांचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल यावेळी धावचीत झाल्याचे पाहायला मिळाले. देवदत्तला केवळ २५ धावांवर समाधान मानावे लागले. मग एका षटकात दोन विकेट्स मिळवल्यावर कोलकाताच्या संघाने काही काळ आरसीबीच्या संघावर दबाव निर्माण केला होता. मात्र त्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि गुरकिरत सिंग यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. कोहली आणि सिंग या दोघांनी स्थिरस्थावर झाल्यावर कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि संघाला मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आरसीबीला सहजपणे या आव्हानाचा पाठलाग करता आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button