नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक! अवनी लेखाराची नेत्रदीपक कामगिरी
![India's first gold medal in shooting! Avni Lekhakar's spectacular performance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Optimized-Avani-Lekhara.jpg)
टोकियो – टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. या पदकामुळे भारताची आजची सुरुवात सुवर्णमय झाल्याचे दिसून आले. पॅरालिम्पिक स्पर्धेत १० मीटर रायफलमध्ये भारताच्या १९ वर्षीय अवनी लेखारा हिने १० मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनी लेखारा हिच्या या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक केले आहे.
अवनी लेखारा हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनिया याने थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. योगेशने ४४.३८ मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, काल दिवसभरात दोन रौप्य पदके भारताच्या खात्यात जमा झाली होती. भाविना पटेल हिने याआधी पॅरालिम्पिकच्या टेबल टेनिसमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती. रौप्यपदक जिंकणारी भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. भाविना पटेलचा टोकियो पॅरालिम्पिकमधील प्रवास अतिशय नेत्रदीपक होता. तिच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असलेली भाविना पटेल मोठ्या खेळाडूंना पराभूत करून पुढे गेली. भाविनाला सुवर्ण जिंकण्याची संधी होती. मात्र अंतिम फेरीत चीनच्या यिंगने तिला सरळ गेममध्ये पराभूत केले. त्यामुळे तिने रौप्य पदकावर नाव कोरले, तर आता अवनी लेखारा हिने सुवर्णपदक जिंकले आहे.