भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : राहुल, मयांक उपलब्ध; धवन, ऋतुराज, श्रेयसबाबत चिंता कायम
![India-West Indies ODI Series: Rahul, Mayank available; Concerns about Dhawan, Rituraj, Shreyas remain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mayank-agraval.jpg)
राहुलने वैयक्तिक कारणास्तव या सामन्यातून माघार घेतली होती.
भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल आणि सलामीवीर मयांक अगरवाल वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्यां एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध असून सोमवारी त्यांनी कसून सरावही केला. परंतु अनुभवी शिखर धवन, मुंबईकर श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड अद्यापही करोनातून सावरलेले नसल्यामुळे ते संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता बळावली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने विंडीजला सहा गडी राखून सहज धूळ चारून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. राहुलने वैयक्तिक कारणास्तव या सामन्यातून माघार घेतली होती. तर मयांक विलगीकरणाच्या नियमांमुळे खेळू शकला नाही. मात्र आता हे दोघेही संघनिवडीसाठी उपलब्ध असल्याने कर्णधार रोहित शर्माला किमान राहुलला खेळवण्यासाठी संघबदल करावा लागणार आहे.
धवन, श्रेयस आणि ऋतुराज यांना गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाल्यामुळे पहिल्या लढतीला मुकावे लागले. त्यांच्या जागी इशान किशन आणि शाहरूख खान यांचा भारताच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला. उभय संघांतील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी खेळवण्यात येईल.