Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टी-२० विश्वचषकात आज भारत-विंडीज आमनेसामने; ‘करो वा मरो’ची लढत

T20 World Cup 2026 | भारतीय फलंदाजांना सूर गवसला असला तरी गोलंदाजीतील अस्थिर कामगिरीमुळे भारतापुढे आज मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल आठ’ फेरीतील निर्णायक सामन्यात भारताचा सामना रविवारी वेस्ट इंडिजशी होणार असून हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो वा मरो’चा ठरणार आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्याने भारताचे आव्हान डळमळीत झाले होते. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले आणि भारताने झिम्बाब्वेवर दमदार विजय मिळवत स्पर्धेतील चुरस कायम ठेवली. त्यामुळे आजचा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय फलंदाजी फॉर्मात दिसली. संजू सॅमसनच्या पुनरागमनाने सुरुवातीला वेग मिळाला, तर अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावत लय मिळवल्याचे दाखवले. तिलक वर्माने सहाव्या क्रमांकावर येत १६ चेंडूत नाबाद ४४ धावा करत फटकेबाजी केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे फलंदाजीची चिंता काहीशी कमी झाली आहे.

हेही वाचा       :                    एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कौतुक

मात्र, गोलंदाजी हा अजूनही चिंतेचा विषय आहे. अर्शदीप सिंगने प्रभावी मारा केला असला तरी फिरकी विभाग अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. वरुण चक्रवर्ती लय गमावलेला दिसत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने चार षटकांत ४७ धावा दिल्या. झिम्बाब्वेविरुद्धही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

ऑलराउंडर शिवम दुबेची गोलंदाजीही संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने केवळ दोन षटकांत ४६ धावा दिल्या. त्यामुळे गोलंदाजीतील समतोल साधणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजसाठी इडन गार्डन्स हे खास मैदान आहे. याच मैदानावर २०१६ मध्ये डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली विंडीजने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी उपांत्य सामन्यात त्यांनी भारतालाच पराभूत केले होते. योगायोग म्हणजे सध्या सॅमी विंडीजचा प्रशिक्षक आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी विंडीजला भारताचा अडथळा पार करावा लागणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा निर्णायक सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button