Ind vs SA 1st Test : दुसऱ्या डावात भारताकडे शतकी आघाडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Ind-Vs-SA.jpg)
आफ्रिकेच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दिलेल्या कडव्या झुंजीमुळे पहिला कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकण्याची शक्यता तयार झाली आहे. भारतीय संघाच्या ५०२ धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांमध्ये आटोपला. भारताने पहिल्या डाव्यात ७१ धावांची आघाडी घेतली. रविचंद्रन आश्विनने सामन्यात ७, रविंद्र जाडेजाने २ तर इशांत शर्माने १ बळी घेतला.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक यांनी शतकं झळकावत आफ्रिकेवरील फॉलोऑनचं संकट टाळलं होतं. मात्र भारताने तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात आफ्रिकेला दोन धक्के देत, पाहुण्या संघाची अवस्था ८ बाद ३८५ अशी केली होती. अखेरच्या दिवसात भारतीय गोलंदाज तळातल्या फलंदाजांना झटपट गुंडाळतील असा सर्वांनी अंदाज बांधला होता.
मात्र सेनुरन मुथुस्वामी आणि कगिसो रबाडा यांनी अखेरच्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत आफ्रिकेच्या धावसंख्येत ४६ धावांची भर घातली. अखेरीस आश्विननेच दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला. दुसऱ्या डावात रोहित शर्माने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात केली. पहिल्या डावातील द्विशतकवीर मयांक अग्रवाल केशव महाराजच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतला. पहिल्या सत्रापर्यंत भारताने १ गडी गमावत ३५ धावांपर्यंत मजल मारली होती.