इगतपुरी रेव्ह पार्टी; बिग बॉस फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक
![Igatpuri Rev Party; Bigg Boss fame actress Heena Panchal arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/heena_1624805744-scaled.jpg)
इगतपुरी – नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी एका ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीसह 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही बिग बॉस फेम अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली डान्सर हीना पांचाळ आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली.
मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ही पार्टी उधळून लावली. पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हीना पांचाळ ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. तसेच हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रियालिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.