अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातचा जयपूरवर थरारक विजय
![Gujarat thrashed Jaipur in a last minute match](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/maharashtra-times-2.jpg)
बंगळुरु | टीम ऑनलाइन
अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर गुजरात जायंट्सने जयपूर पिंक पँथर्सवर थरारक विजय मिळवला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला सुरुवात झाल्यावर दोन्ही संघांमध्ये फक्त दोन गुणांचा फरक होता. त्यामुळे हा सामना जिंकण्याची संधी गुजरात आणि जयपूर या दोन्ही संघांना होती. पण अखेरच्या मिनिटामध्ये गुजरातच्या संघाने सर्वस्व पणाला लावत हा सामना ३४-२७ असा जिंकला.
गुजरात आणि जयपूर यांच्यातील आजचा पहिला सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्याच्या सुरुवातीला जयपूरने दमदार खेळ करत चांगली आघाडी घेतली होती. पण त्यानंतर गुजरातच्या संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि मध्यंतरापर्यंत त्यांनी जयपूरच्या संघाला चांगली झुंज देत आघाडीही मिळवली. मध्यंतरापर्यंत गुजरातने जयपूरवर १९-१७ अशी दोन गुणांनी आघाडी मिळवली होती. यावेळी गुजरातच्या संघाने आक्रमणापेक्षा पकडींवर जास्त भर दिल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या सत्रात जयपूरला पकडींमध्ये फक्त तीन गुण कमावता आले होते, तिथे गुजरातने सात गुणांची कमाई केली होती. पण यावेळी पिछाडीवर असतानाही जयपूरचा संघ हा आक्रमणात पुढे असल्याचे पाहायला मिळाले. कारण मध्यंतरापर्यंत जयपूरच्या संघाने चढाईमध्ये ११ गुण पटकावले होते, पण दुसरीकडे गुजरातच्या संघाला पहिल्या सत्रात आक्रमण करताना आठ गुणांचीच कमाई करता आली होती.
दुसऱ्या सत्रात हा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. सामन्याच्या ३४व्या मिनिटाला गुजरात आणि जयपूर या दोन्ही संघांची २५-२५ अशी बरोबरी झाली होती. या सत्रात गुजरातने पहिल्या सत्रात आपल्याकडून झालेल्या चुका सुधारण्यावर भर दिला. दुसऱ्या सत्रात चांगला बचाव करत असताना गुजरातने जोरदार आक्रमणही केले आणि आघाडी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर गुजरातच्या बचावपटूंनीही यावेळी दमदार कामगिरी करत जयपूरच्या चढाईपटूंना जास्त गुण कमावण्याची संधी दिली नाही. सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना गुजरातकडे दोन गुणांची आघाडी होती. त्यावेळी हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकला असता. पण यावेळी गुजरातच्या संघाने आपले सर्वस्व पणाला लावले आणि अखेरच्या मिनिटात दमदार कामगिरी करत गुजरातच्या संघाने ३४-२७ असा विजय साकारला.