#CoronaVirus: आंतरराष्ट्रीय खेळाडूला कोरोनाची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/nbacorona_2.jpg)
Corona Virus हा जगभरातील १०० देशांमध्ये परसला असून जवळपास सर्वच महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोणतीही स्पर्धा पाहण्यासाठी जमणाऱ्या गर्दीतून कोरोना विषाणू एका झटक्यात हजारो लोकांमध्ये पसरू शकतो, त्यामुळे काही स्पर्धा बंद दरवाजात म्हणजेत प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येत आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( आयपीएल 2020) असाच निर्णय होण्याची शक्यता आहे, तर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे उर्वरित सामन्यांत प्रेक्षकांना नो एट्री असल्याची घोषणा आजच करण्यात आली. पण, आता या विषाणूची लागण चक्क खेळाडूलाच झाल्याचे समोर आली आहे आणि त्यामुळे संपूर्ण लीग रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच NBA लीग रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. NBA लीगमधील यूटाह जॅझ संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जॅझ आणि थंडर्स यांच्यातील सामन्यापूर्वीच हा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला, त्यामुळे सामनाही रद्द करण्यात आला आहे. पण, कोरोनाची लागण झालेला खेळाडू त्यावेळी कोर्टवर उपस्थित नसल्याची माहिती NBAने दिली.
”पुढील आदेशापर्यंत NBAचे सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी NBAकडून योग्य ती काळजी घेतली जाईल, ” असे NBAने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. गोल्डन स्टेट वॉरियर्स संघ पुढील आठवड्यात सामना खेळवणार आहे, परंतु तो बंद स्टेडियमवर होईल. त्यांनी दोन आठवड्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियवर प्रवेश नाकारला आहे. NBAचे मालकांनी बैठक बोलावली असून पुढील वाटचाली बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. NBAने त्या खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु अमेरिकन मीडियानं केलेल्या दाव्यानुसार रुडी गोबर्ट असे या खेळाडूचे नाव आहे. त्याचा सहकारी एमॅन्युएल मुडीयल हाही आजारी पडला आहे, परंतु त्याची लक्षण कोरोना विषाणूची आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.