BBLमध्ये कोरोनाचा धुमाकूळ;मॅक्सवेल कोरोना पॉझिटिव्ह
![Corolla outbreak in BBL; Maxwell Corona positive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Esakal___2022_01_05T115538_620-1.jpg)
मेलबर्न | प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिकेबरोबरच बीग बॅश लीग स्पर्धा देखील सुरु आहे. बीग बॅश लीगच्या बायो बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. काही संघातील १० ते १२ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने सामने स्थगित करण्याची मालिकाच सुरु झाली आहे.
मेलबर्न स्टार्स संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती फ्रेंचायजीने दिली. त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मॅक्सवेलला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मेलबर्न स्टार्सचे आतापर्यंत १२ खेळाडू आणि आठ सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यंदाच्या हंगामात मेलबर्न स्टार्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांना ८ सामन्यापैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत.
बीग बॅश लीगमधील संघामध्ये कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजचा ब्रिसबेन हीट आणि सिडनी सिक्सर यांच्यातील सामनाही स्थगित करावा लागला आहे. ब्रिसबेन हीट संघातील तब्बल १२ खेळाडूंची पीसीआर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या १२ खेळाडूंची रिप्लेसमेंट २४ तासात उभा करणे ब्रिसबेन हीटला शक्य झाले नाही. त्यांना आजच्या सामन्यासाठी १३ खेळाडूंचा संघ तयार करायचा होता.