भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची कोहलीविरोधात थेट जय शाहंकडे तक्रार
![Complaints of Indian cricket team players against Kohli directly to Jai Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/virat-kohli-rcb_806x605_61490942476.jpg)
मुंबई – भारतीय क्रिकेट संघात सध्या विराट कोहलीविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. रोहित शर्मा याला उपकर्णधार पदावरून हटविण्याचे मनसुबे बाळगून असलेल्या विराट कोहलीला त्यात अपयश आल्याने स्वतःच त्याने आपल्या टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप होऊ लागले आहेत. त्याची संघातील वागणूक पूर्णपणे बदलली असल्याचा दावा करत भारतीय संघातील खेळाडूंनी आता विराट कोहलीविरोधात थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.
न्यूझीलंडविरोधातील वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या वागण्यातील बदल सर्वांनाच जाणवू लागला होता. पण कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर तो प्रकर्षाने उफाळून आल्याचे या खेळाडूंचे म्हणणे आहे. विराट हा आपला संयम गमावताना दिसत आहे. तो नेट प्रॅक्टिसदरम्यान प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानंतर त्यांच्यावरच रागावला होता. मला गोंधळात टाकू नका, असे तो म्हणाला होता. कोहली आता प्रेरणादायी खेळाडू राहिलेला नाही. तो इतर खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही. उलट त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्याचे खापर संघातील खेळाडूंवर फोडले होते. आता खेळाडूंमध्ये ती जिद्द आणि चिकाटी राहिली नाही, असे विराट म्हणाला होता. या वक्तव्यामुळे भारतीय संघातील सर्वच खेळाडू त्याच्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी त्याची थेट जय शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात विराटला एकही शतक करता आलेले नाही.