इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सहाव्यांदा उंचावली अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी

India U19 vs England U19, Final: मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास घडवला आहे. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ४११ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर करून सहाव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुरूवातीला फसला. कारण गेल्या सामन्यातील शतकवीर आरोन जॉर्ज या महत्वाच्या सामन्यात अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मिळून १४२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या साहाय्याने १७५ धावांची खेळी केली. या जोडीने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. वैभव सूर्यवंशीचं दुहेरी शतक अवघ्या २५ धावांनी हुकलं. त्यानंतर वेदांत त्रिवेदी ३२ आणि विहान मल्होत्राने ३० धावांची खेळी केली. शेवटी अभिज्ञान कुंडूने ४० आणि कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ९ गडी बाद ४११ धावांवर पोहोचवली.
हेही वाचा – कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला गती; 15 दिवसांत भूसंपादन पूर्ण होणार
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही सुरूवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुरेस अवघ्या १७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. डॉकिन्सने ६६ धावा केल्या. तर मेयस ने ४५ धावा केल्या. पण हे दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत. शेवटी इंग्लंडकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण विकेट्स शिल्लक नव्हत्या. शेवटी कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने महत्वपूर्ण खेळी केली. पण तो देखील संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. वैभवने अवघ्या ५५ चेंडूत वेगवान शतक झळकावलं. हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. वैभव या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याने १५ चौकार आणि १५ षटकार खेचले.




