केकेआरला धक्का! मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्याचे बीसीसीआयचे निर्देश

Mustafizur Rahman | बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि तेथील अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांमुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत बांगलादेशी खेळाडूच्या सहभागावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमध्ये खेळवण्यास काही राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवला होता. या वादानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. तीन वेळा आयपीएल विजेते ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमान याला संघातून रिलीज करण्याचे निर्देश बीसीसीआय कडून देण्यात आले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ही माहिती दिली.
“सध्या देश-विदेशात सुरू असलेल्या ताज्या घडामोडी लक्षात घेता, केकेआर फ्रँचायझीला मुस्तफिजूर रहमान याला संघातून रिलीज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गरज भासल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू निवडण्यास परवानगी दिली जाईल,” असे सैकिया यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा : पक्षहितासाठी कटिबद्ध : ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर यांची उमेदवारी माघारी!
१६ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात केकेआरने मुस्तफिजूर रहमान याला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याची बेस प्राइस २ कोटी रुपये होती. विशेष म्हणजे या लिलावात सात बांगलादेशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता, मात्र फक्त मुस्तफिजूरवरच बोली लागली होती.
या खरेदीमुळे केकेआर संघ आणि संघाचा सहमालक बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांच्यावर सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्याचे दिसून आले.
मुस्तफिजूर रहमानने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६० सामने खेळत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. २०१६ साली त्याने सनरायजर्स हैदराबाद संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी हैदराबाद संघाने विजेतेपद पटकावले होते. २०१९ आणि २०२० हे दोन हंगाम वगळता तो सातत्याने आयपीएलमध्ये खेळत आला आहे. जर तो यंदा खेळला असता, तर आयपीएलमधील त्याचे हे दहावे वर्ष ठरले असते. मात्र बीसीसीआयच्या निर्णयामुळे आता तो आयपीएल २०२६ स्पर्धेत सहभागी होणार नाही.





