क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

ऑलराउंडर रवींद्र जडेजा याचाही टी20 क्रिकेटला रामराम

अविस्मरणीय विजयानंतर विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा यांची निवृत्तीची घोषणा

मुंबई : टीम इंडियाने 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने 177 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयानंतर विराट कोहली आणि त्याच्या पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी20 क्रिकेटला रामराम केला आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

जडेजाने सोशल मीडिया पोस्ट मध्ये काय म्हटलं?
रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो पोस्ट केला आहे. जडेजाने या पोस्टमध्ये भरभरुन लिहिलंय. “मनपूर्वक आभार, मी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतोय. मी नेहमीच अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे देशासाठी 100 टक्के देत राहिन. तसेच मी इतर फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. टी 20 वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. अविस्मरणीय आठवणी, उत्साह आणि बिनशर्थ पाठिंब्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद “, असं जडेजाने इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं.

रवींद्र जडेजा याची टी20 कारकीर्द
रवींद्र जडेजाने 10 फेब्रुवारी 2009 साली श्रीलंकेविरुद्ध टी20i पदार्पण केलं होतं. जडेजाने तिथपासून ते आता टी 20 वर्ल्ड कप फायनल 2024 पर्यंत एकूण 74 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. जडेजाने या 74 सामन्यांमधील 41 डावात बॅटिंग करताना 515 धावा केल्या. तर 71 डावात 54 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाची 15 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

24 तासात तिघांकडून रामराम
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप जिंकताच सर्वात आधी विराट कोहलीने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर काही मिनिटांनी कॅप्टन रोहित शर्माने पत्रकार परिषदेत शॉर्ट फॉर्मेटला अलविदा करत असल्याचं सांगितलं. तर आता जडेजाने साऱ्यांचे आभार मानत इथेच थांबत असल्याचं म्हटलंय. एकाच वेळी या तिघांनी टी20 क्रिकेटसह नाळ तोडलीय. आता या तिघांच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळणार, हे निश्चित झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button