विराट कोहली ठरला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/virat-.jpg)
- फोर्ब्सच्या यादीत 83 व्या क्रमांकावर विराजमान
नवी दिल्ली – क्रिकेटपटू विराट कोहली जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला आहे. फोर्ब्ज नियतकालिकाने त्याला हा दर्जा दिला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अमेरिकन बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉइड मेवेदर पहिल्या स्थानावर असून फोर्ब्जचा या यादीत विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
विराट कोहलीचा क्रमांक 83 वा असून त्याची कमाई 24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 161 कोटी रुपये) असल्याचा फोर्ब्जचा अंदाज आहे. जगप्रसिद्ध नियतकालिक “फोर्ब्स’ने 2018 या वर्षात जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. जाहीर झालेल्या अव्वल 100 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत केवळ एकाच भारतीय खेळाडूचा समावेश असल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे जाहीर झालेल्या यादीमध्ये एकाही महिला खेळाडूचा समावेश नाही.
या यादीमध्ये कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आणि भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने 161 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये सर्वात जास्त हिस्सा हा जाहिरातींमधून येणाऱ्या मिळकतीचा आहे. कारण बीसीसीआयकडून मिळालेले मानधन आणि सामना जिंकल्यानंतर मिळणाऱ्या राशीमधून कोहलीने 27 कोटी रुपये कमावले आहेत, तर जाहिरातींमधून कोहलीने 134 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोहलीच्या कमाईबाबत फोर्ब्सने म्हटले आहे की, खेळामधून मिळणाऱ्या मानधनापेक्षा कोहलीने जाहिरातींमधून जास्त पैसे कमावले आहेत. कोहलीकडे सध्याच्या घडीला प्युमा, पेप्सी, ऑडी या नामांकित कंपन्यांच्या जाहिराती आहेत.
सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये 40 बास्केटबॉलपटूंचा समावेश असून यात 18 अमेरिकन फुटबॉलपटू आणि 14 बेसबॉलपटू आहेत. याशिवाय फुटबॉलमधील 9, गोल्फमधील 5, मुष्टियुद्धातील 4, टेनिसमधील 4 आणि ऑटो रेसिंगमधील 3 खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. तसेच क्रिकेट, मिक्स्ड मार्शल आर्टस आणि ट्रॅक ऍण्ड फील्ड या खेळातील प्रत्येकी 1 खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
यादीतील पहिले पाच खेळाडू-
पहिल्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मुष्टियोद्धा फ्लॉयड मेवेदर याने पटकावला असून 2018 या वर्षातील त्याची कमाई 1913.3 कोटी रुपये आहे. तर फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (744.2 कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनॉल्डो (724.2 कोटी), मिक्स्ड मार्शल आर्टस खेळाडू कोनॉर मॅकग्रेगर (663.9 कोटी) व फुटबॉलपटू नेमार (603.5 कोटी) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.