‘मोदी, तुम्हाला आमचा राशिद देणार नाही’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rashid-khan.jpg)
नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमात हैदराबाद आणि कोलकात्यामध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात उत्कृष्ट खेळी करणाऱ्या फिरकी गोलंदाज राशिदला भारताला देणार नसल्याचे काल अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी ट्विट करून स्पष्ट केलं.
राशिद खानने शुक्रवारच्या सामन्यात १९ धावा देत तीन विकेट घेतल्या तर १० चेंडूत ३४ धावा करत हैदराबादला विजयाच्या जवळ पोचवलं. त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर हैदराबादने कोलकात्याला धुळ चारत अंतिम फेरीत धडक दिली आहे. यावर खूश होऊन अश्रफ घानींनी राशिदची ट्विटरवर स्तुती केली.
‘राशिद खान हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी दिल्याबद्दल आम्ही भारताचे आभार मानतो. अफगाणिस्तानकडे असलेल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वांपैकी एक राशिद आहे. राशिद क्रिकेट जगतातलाही एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. नरेंद्र मोदी, आम्ही राशिदला कुणालाच देणार नाही’ असे ट्विट घानींनी केले आहे.