क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

R Ashwin Retirement | रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे.
रविचंद्रन अश्विनची कसोटी कारकीर्द
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ३७ वेळेस ५ विकेट घेतले आहेत आणि ८ वेळा सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी-२० मध्ये ७२ विकेट घेतल्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ७६५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३५०३ धावा आहेत आणि त्याने एकूण ६ कसोटी शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण ८ शतकं होती.