भारतीय महिलांची मालिकेत विजयी आघाडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Untitled-1-13.jpg)
- भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका
कर्णधार मिताली राज (६६ धावा) आणि अनुभवी पूनम राऊत (६५) यांनी साकारलेल्या अप्रतिम अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी आणि १२ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
बडोदा येथील रिलायन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार मितालीने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आफ्रिकेची सलामी जोडी लिझेल ली (४०) आणि लॉरा वॉल्वरडर्ट (६९) यांनी मात्र पहिल्या गडय़ासाठी ७६ धावांची भागीदारी रचून दमदार सुरुवात केली. पूनम यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले, तर शिखा पांडेने वॉल्वरडर्टला माघारी पाठवले. परंतु मिग्नोन डूप्रीझ (४४) व त्रिशा छेट्टी (२२) यांनीही बहुमूल्य योगदान दिल्यामुळे आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २४७ धावांपर्यंत मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना भारताने गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर प्रिया पुनिया (२०) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१८) यांना स्वस्तात गमावले. मात्र २ बाद ६६ धावांवरून पूनम आणि मिताली यांनी संघाचा डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या गडय़ासाठी १२९ धावांची भागीदारी रचल्यामुळे भारताने विजयाच्या दिशेने कूच केली. मितालीने आठ चौकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील ५३वे, तर पूनमने सात चौकारांच्या साथीने कारकीर्दीतील १२वे अर्धशतक साकारले.
परंतु या दोघीही लागोपाठच्या षटकांत माघारी परतल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. दीप्ती शर्माही (२) लगेचच बाद झाली. मात्र हरमनप्रीत कौर (नाबाद ३९) आणि यष्टीरक्षक तानिया भाटिया (नाबाद ८) यांनी पाचव्या गडय़ासाठी ३६ धावांची भर घालून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ६५ धावांची खेळी साकारणाऱ्या पूनमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना सोमवारी खेळला जाणार आहे.