भारताच्या स्वस्तिका घोषला मुलींच्या दुहेरीत कांस्यपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/SWASTIKA.jpg)
हॉंगकॉंग खुली टेबल टेनिस स्पर्धा
मुंबई: भारताची गुणवान कुमार टेबल टेनिस खेळाडू स्वस्तिका घोषने सिंगापूरच्या जिंगयि झोऊच्या साथीत ज्युनियर मुलींच्या गटातील दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावून हॉंगकॉंग येथे सुरू असलेल्या हॉंगकॉंग ज्युनियर आणि कॅडेट खुल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
स्वस्तिका आणि जिंगयि जोडीने तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडू पेइ लिंग सु आणि यु चिन टीसाई या जोडीचा उपउपान्त्यपूर्व फेरीत 3-1 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. त्यानंतर त्यांनी चीनच्या बिन्युझ झॅंग आणि यि चेन यांचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव करत उपान्त्य फेरी गाठली. मात्र उपान्त्य फेरीत तैपेईच्या लि लिन जेसे आणि रुई लिंग वेन या जोडीने त्यांचा 2-3 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
या पराभवाने स्वस्तिका आणि जिंगीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तसेच सुवर्णपदकाची त्यांची संधी हुकली असली, तरी त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर याच स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या दुहेरीत भारतीय खेळाडूंच्या रेगन अल्बुकर्क आणि पायस जैन या जोडीचा थायलंडच्या यानापोंग पॅनागितगन आणि सुपाक्रॉन पंखाओयॉय या जोडीने उपउपान्त्यपूर्व फेरीत पराभव करून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.