भारताचा आयर्लंडवर 76 धावांनी एकतर्फी विजय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/cricket-.jpg)
डब्लिन – सर्व क्षेत्रांत निर्विवाद सरस कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात दुय्यम दर्जाच्या आयर्लंड संघाचा 76 धावांनी दणदणीत पराभव करताना इंग्लंड दौऱ्याचा विजयी प्रारंभ केला.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या झंझावाती सलामीमुळे नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 208 धावांची मजल मारली. त्यानंतर आयर्लंडचा डाव निर्धारित 20 षटकांत 9 बाद 132 धावांवर रोखून भारताने विजयाची पूर्तता केली.
विजयासाठी 209 धावांच्या आव्हानासमोर जेम्स शॅनॉन वगळता आयर्लंडचे बाकी फलंदाज अपयशी ठरले. शॅनॉनने 35 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 60 धावा फटकावून एकाकी झुंज दिली. भारताकडून कुलदीप यादवने 21 धावांत 4, यजुवेंद्र चाहलने 38 धावांत 3, तर बुमराहने 19 धावांत 2 बळी घेतले.
त्याआधी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्यापासून आक्रमक फलंदाजी करताना भारताला 16 षटकांत 160 धावांची मजबूत सलामी दिली. अखेर केविन ओब्रायनने शिखर धवनला बाद करून ही जोडी फोडली. धवनने केवळ 45 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. सुरेश रैनाने 10, तर महेंद्रसिंग धोनीने 5 चेंडूंत 11 धावा केल्या.
रोहित शर्माचे तिसरे टी-20 शतक केवळ 3 धावांनी हुकले. त्याने 61 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 97 धावांची खेळी केली. परंतु पीटर चेजने 20व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर धोनीला, तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला, तर पाचव्या चेंडूवर विराट कोहलीला बाद करताना भारताचा डाव 208 धावांवर रोखला. चेजने 35 धावांत 4 गडी बाद करताना आयर्लंडकडून गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली.