फ्रेंच ओपन टेनिस : हालेप-मुगुरुझा उपान्त्य लढत रंगणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/halep-and-muguruza-.jpg)
- मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात
पॅरिस – अग्रमानांकित सिमोना हालेप आणि स्पेनची तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा या अव्वल खेळाडूंमध्ये येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची दुसरी उपान्त्य लढत रंगणार आहे. दोन अमेरिकन खेळाडूंमध्ये होणाऱ्या पहिल्या उपान्त्य लढतीत दहाव्या मानांकित स्लोन स्ठीफन्ससमोर तेराव्या मानांकित मॅडिसन कीजचे आव्हान आहे. महिला एकेरीतील अग्रमानांकित खेळाडू सिमोना हालेपने महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत बाराव्या मानांकित अँजेलिक कर्बरची कडवी झुंज तीन सेटमध्ये मोडून काढली. कर्बरने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकून 1-0 अशी आघाडी घेत स्पर्धेतील सर्वात सनसनीाट निकालाची तयारी केली होती. परंतु हालेपने दुसरा सेट सहज जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या सेटमध्येही आपले वर्चस्व कायम राखताना 6-7 (2-7), 6-3, 6-2 अशा विजयाची नोंद करताना उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्याआधी हालेपने बेल्जियमच्या एलिसे मेर्टेन्सचे आव्हान संपुष्टात आणताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत अँजेलिक कर्बरने सातव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाची कडवी झुंज मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते. त्याआधी स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाने रशियाच्या 28व्या मानांकित मारिया शारापोव्हाचा 6-2, 6-1 असा जेमतेम सव्वा तासांत धुव्वा उडविताना दिमाखात उपान्त्य फेरी गाठली. मातृत्वाच्या सुटीनंतर परतलेल्या सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर तिच्याकडून गेल्या 14 वर्षांत सलग 18 वेळा पराभूत झालेल्या मारिया शारापोव्हाला संधी असल्याचे मानले जात होते. परंतु आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मुगुरुझाने शारापोव्हाला संधीच दिली नाही.
पुरुष दुहेरीत पिअरे ह्यूजेस हर्बर्ट आणि निकोलस माहुत या सहाव्या मानांकित जोडीने मॅक्झिमो गोन्झालेस आणि निकोलस जॅरी या बिगरमानांकित जोडीचे आव्हान 6-4, 7-6 असे मोडून काढताना उपान्त्य फेरीत धडक मारली.