फिफा विश्वचषक : बलाढ्य अर्जेंटिनाला रोखण्यात आइसलॅंड यशस्वी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/argentina-vs-iceland-.jpg)
मॉस्को – फिफा विश्वचषकात बलाढ्य संघ मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाला आपल्या पहिल्याच सामन्यात बरोबरीवर समाधान मानावं लागलं आहे. विश्वचषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या आईसलॅंडने दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या अर्जेंटिनाला 1-1 अशा बरोबरीत रोखलं. अप्रतिम बचावाचं प्रदर्शन करत आईसलॅंडने अर्जेंटिनाच्या आक्रमण फळीचे सर्व हल्ले परतवून लावले. या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या हुकलेल्या पेनल्टी किकने आईसलॅंडला सामना बरोबरीत राखण्यात यश मिळाले.
आईसलॅंडचा गोलकिपर हल्डरसन हा आजच्या सामन्याचा खरा हिरो ठरला. अर्जेंटिनाच्या मेसी, ऍग्वेरो यांसारख्या खेळाडूंची आक्रमण हल्डरसनने मोठ्या शिताफीने रोखली. सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतलेल्या अर्जेंटिनाने 19 व्या मिनीटाला गोल केला. सर्जिओ ऍग्वेरोने हल्डरसनचा चकवत आपल्या संघाचा पहिला गोल केला. मात्र 23 व्या मिनीटाला आइसलॅंडच्या फिनबॉग्सनने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत सामन्यात बरोबरी साधून दिली. यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे गोल करण्याचे प्रत्येक प्रयत्न आईसलॅंडच्या खेळाडूंनी हाणून पाडले.
मेसीने आजच्या सामन्यात 11 वेळा गोलपोस्टवर आक्रमण केलं. मात्र त्याची एकही किक गोलमध्ये रुपांतरीत होऊ शकली नाही. पहिल्याच सामन्यात बरोबरी साधल्यामुळे आता पुढील सामन्यात विजय मिळवणं अर्जेंटिनासाठी अनिवार्य बनलं आहे. सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाचा तब्बल 78% वेळ चेंडूवर ताबा होता तरी त्यांना आइसलॅंडचा बचाव भेदण्यात अपयश आले. त्यामुळे विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळणाऱ्या आईसलॅंडचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.