दुबळ्या राजस्थानसमोर बंगळुरूचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rr-vs-rcb.jpg)
- बाद फेरी गाठण्यासाठीच लढणार दोन्ही संघ
जयपूर – आयपीएलच्या अकराव्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यापासून पिछाडीवर पडलेल्या, मात्र हंगाम संपताना पुनरागमन करत बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज रंगणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. परंतु जोस बटलर आणि बेन स्टोक्स हे अव्वल खेळाडू इंग्लंडकडून खेळण्यासाठी मायदेशी परतले असल्यामुळे राजस्थान संघाची निश्चितच ताकद कमी झाली आहे.
दोन्ही संघानी चालू हंगामातील आपल्या प्रवासात अनेक चढ-ऊतार पाहिले. चांगले खेळाडू असूनही हे दोन्ही संघ केवळ एक ते दोन खेळाडूंच्या कामगिरीवर सुरुवातीपासून अवलंबून राहिले.त्यामुळे अनेक सामन्यात त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. परंतु जसजसा हंगाम शेवटाकडे जात आहे, तसतसे दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंना पुन्हा सूर गवसू लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी बाद फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
बंगळुरूकडे विराट कोहली, ऍब डीव्हिलिअर्स, ब्रेन्डन मॅक्युलम, क्विन्टन डी कॉक, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन यांसारखे तगडे फलंदाज असतानाही त्यांना सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला. त्यातच उमेश यादव वगळता त्यांचा एकही गोलंदाज प्रभावी ठरू शकला नव्हता मात्र गेल्या तीन-चार सामन्यांत विराट कोहली, पार्थिव पटेल, ऍब डीव्हिलिअर्स, मोईन अली आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी पुनरागमन केले आहे.
उमेशबरोबरच यजुवेंद्र चाहल, टिम साऊदी हे देखील चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे बंगळुरूने मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. त्यातच त्यांनी आपल्या अखेरच्या सामन्यात हैदराबादसारख्या तगड्या संघाचा 14 धावांनी पराभव करत आपली धावगती देखील उंचावली आहे. आजचा सामना जिंकल्यास त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी सरस धावगतीचाच आधार मिळणार आहे.
तर दुसरीकडे राजस्थानने आपल्या 13 सामन्यांपैकी सहा सामन्यांत विजय मिळवला असून सात सामन्यात त्यांनी पराभव पत्करला आहे. राजस्थानचा संघ सध्या फलंदाजीत सलामीवीर जोस बटलर आणि गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर यांच्यावर अवलंबून आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये बटलरने एकहाती विजय मिळवून दिला असून त्याला कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नव्हती. त्यामुळे उद्याच्या सामन्यात अन्य फलंदाजांवर बटलरच्या गैरहजेरीत संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विन्टन डी कॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम. अश्विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.
राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्रिच क्लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.
सामन्याचे ठिकाण- जयपूर, सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून.