टोकियो ऑलिम्पिकचे वेळापत्रक धोक्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Tokyo-olympic-.jpg)
- अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण, आर्थिक संकटाचेही सावट
टोकियो – जपानमध्ये 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेसाठी केवळ दोनच वर्षे शिल्लक राहिली आहेत. मात्र, त्यासाठीची तयारी अजून अपूर्ण असून अनेक कामे रखडलेली असल्याने ऑलिम्पिक आयोजकांना चिंतेने ग्रासले आहे. तसेच ऑलिम्पिकच्या कालावधीत येथील हवामान उष्ण राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोजकांच्या चिंतेत भर पडली आहे.
टोकियो येथे 24 जुलै 2020 रोजी सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची उलटगणती सुरू झाली असून तेथील संभाव्य वाढत्या तापमानाने आयोजकांमध्ये चिंता पसरवली आहे. मात्र आयोजकांनी अशा परिस्थितीतही ही स्पर्धा जुलै महिन्यातच होईल असे जाहीर केले आहे. या स्पर्धेसाठी 2 अब्ज डॉलर खर्चून बनवण्यात आलेल्या पहिल्या स्टेडियमचे अनावरण पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या हस्ते मागच्याच वर्षी म्हणजे स्पर्धेला तीन वर्षे बाकी असतानाच केले गेले आहे. त्यानुसार स्पर्धेसाठीच्या तयारीला वेग आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते. मात्र अजूनही अनेक कामे अपूर्ण असून ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे दडपण आयोजकांवर आहे. त्यातच स्पर्धेच्या लोगोवर वाड्.मयचौर्याचे आरोप झाल्याने आयोजकांवरचा दबाव आणखीनच वाढला आहे.
त्यातच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मैदानावरील रोगकारक सूक्ष्मजंतूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगताना या स्पर्धेच्या ठिकाणात बदल केला जाण्याची शक्यताही वर्तवली होती. टोकियो येथील तापमान किंवा रखडेली कामे इत्यादी वादग्रस्त बाबींपेक्षा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याकडे माझे अधिक लक्ष आहे, असे रिओ ऑलिम्पिक कांस्यविजेत्या दाईया सेटोने सांगितले.
त्याचबरोबर अकियो नागुची या अव्वल ऍथलीटने सांगितले की, घरच्या प्रेक्षकांसमोर आपली प्रतिभा सादर करायला मिळत असल्याने मी स्वतःला नशिबवान समजतो आणि आशियाई सुवर्णपदक जिंकून या संधीचे मी सोने करून दाखवेन. मात्र आपल्यावर घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे असल्याने त्यांच्यासमोर अव्वल कामगिरी करणे अवघड असते. असेही त्याने यावेळी सांगितले.
स्पर्धकांसमोर 35 डिग्री सेल्सियस तापमानाचेआव्हान
ऑलिम्पिक स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागणारे खेळ असतात. ज्यामध्ये उर्जा, उत्साह जोम महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे तापमान उष्ण असेल, तर खेळाडूंना सर्वोत्तम कामगिीर बजावण्यात अडथळे येतात. त्यातच जुलै महिन्यात टोकियोतील तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस, म्हणजे जवळपास 95 अंश फॅरनहाईट इतके असते. त्यामुळे या वातावरणात आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर असणार आहे. यापूर्वी टोकियोने 1964 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र त्यावेळी ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात झाल्याने उष्ण हवामानाची समस्या जाणवली नव्हती.