टीम इंडियाच्या क्रिकेटपटूच्या घरात लग्नाआधीच पाळणा हलणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG_20200601_101103.jpg)
मुंबई : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लग्नाआधीच बाप होणार आहे. हार्दिक पांड्याने त्याची होणारी बायको नताशा स्टानकोविचसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. नताशाच्या पोटावर हात ठेवलेला फोटो टाकून हार्दिक पांड्याने ही घोषणा केली आहे. लवकरच आमच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची पोस्ट हार्दिकने इन्स्टाग्रामवर टाकली आहे.
नताशा आणि माझा एकमेकांसोबतचा प्रवास खूपच चांगला होता, आता हा प्रवास आणखी चांगला होणार आहे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आयुष्याच्या या नव्या वळणासाठी आम्ही उत्साही आहोत. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाची गरज आहे,’ अशी पोस्ट हार्दिकने केली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची घोषणाही इन्स्टाग्रामवरुनच केली होती. दुबईमध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. या दोघांनी अजूनही लग्न केलेलं नाही.