जगविख्यात तुसॉ संग्रहालयात कोहलीचा पुतळा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/virat-statue-.jpg)
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली याचा मेणाचा पुतळा जगविख्यात मॅडम तुसॉ संग्रहालयात आज दाखल झाला. भारताच्या राजधानीत असलेल्या तुसॉ संग्रहालयाच्या शाखेत कोहलीच्या पुतळ्याचे आज उत्साही वातावरणात अनावरण करण्यात आले. या संग्रहालयात बॉलीवूड व हॉलीवूड तारेतारकांसह विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पुतळ्यांचा समावेश आहे.
फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी, भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव आणि जगातील सर्वाधिक वेगवान मानव असा लौकिक मिळविणारा जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट यांच्यानंतर मॅडम तुसॉ संग्रहालयात दाखल झालेला क्रीडापटूंचा हा चौथा पुतळा ठरला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी विराट कोहलीची विविध बारकाव्यांसह किमान 200 मापे घेण्यात आली होती. तसेच वेगवेगळ्या कोनातून कोहलीची असंख्य छायाचित्रे काढण्यात आली होती. फटका लगावण्याच्या तयारीत असलेला भारतीय संघाची जर्सी परिधान केलेला कोहली या पुतळ्यातून आपल्याला दिसतो.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 2006 मध्ये पदार्पण केल्यानंतर पहिली काही वर्षे कोहलीने यशस्वी होण्यासाठी कडवा संघर्ष केला. परंतु एक उदयोन्मुख व गुणवान फलंदाजापासून भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार आणि जगातील एक अग्रगण्य फलंदाज हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकला होता. आयसीसीचा सर्वोत्तम क्रिेकेटपटू पुरस्कार, बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, तसेच अर्जुन पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार कोहलीने मिळविले आहेत.
मर्लिन एन्टरटेनमेंट्सचे संचालक व महाव्यवस्थापक अंशुल जैन यावेळी म्हणाले की, विराट हा केवळ एक स्टार क्रिकेटपटू नसून त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याच्या पाठीराख्यांची वसाढणारी संख्या पाहता विराटचा पुतळा तुसॉ संग्रहालयात असणे ही केवळ औपचारिकताच होती. विराट कोहलीच्या पुतळ्यामुळे तुसॉ संग्रहालयाचे आकर्षणमूल्य आणखीनच वाढेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
विराटला प्रतीक्षा चाहत्यांच्या प्रतिसादाची
आपला पुतळा संग्रहालयात बसविल्याबद्दल विराट कोहलीने मॅडम तुसॉ व्यवस्थापनाला धन्यवाद दिले. त्यासाठी संग्रहालयाच्या सर्व तंत्रज्ञ आणि कारागिरांनी घेतलेल्या अफाट परिश्रमांचेही त्याने कौतुक केले. आपली निवड केल्याबद्दल आभार मानताना विराट म्हणाला की, तुसॉ संग्रहालयातील पुतळ्याचे अनावरण हा माझ्या जीवनातील अत्यंत संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. माझ्या चाहत्यांनी दिलेले अफाट प्रेम आणि पाठिंबा यामनुळेच मी येथपर्यंत पोहोचू शकलो आहे. परंतु या पुतळ्याबद्दल माझे चाहते कसा प्रतिसाद देतात, याची मला प्रतीक्षा आणि उत्सुकताही आहे. अखेर या पुतळ्यामुळे मला जगभरातील महान व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात स्थान मिळाले आहे.