कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्स नव्या जर्सीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Screenshot-21.png)
नवी दिल्ली – जगभरात कोरोना संकट असताना १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये यंदाचे आयपीएल खेळले जाणार आहे. आयपीएलमध्ये खेळताना विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कोरोना योद्ध्यांना विशेष सन्मान देणार आहे. बंगळुरूचे खेळाडू आयपीएलमध्ये कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ ‘माय कोव्हिड हिरोज’ लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.
लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये जर्सीच्या लॉचिंगवेळी विराट कोहली म्हणाला की, पहिल्यांदा एक टीम स्वरूपात आम्ही याप्रकारच्या शानदार मोहीमशी जोडले गेलो आहोत. हे त्या कोरोना योद्ध्यांना समर्पित आहे, ज्यांनी स्वतःची पर्वा न करता निस्वार्थीपणे दुसऱ्यांचा विचार केला. हा आमच्याकडून त्यांच्यासाठी सलाम आहे. ही जर्सी घालणे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.
आरसीबीचे चेअरमन संजीव चुडीवाला म्हणाले की, खेळाडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि सरावाच्या वेळी या जर्सीमध्ये दिसतील. पहिल्या सामन्यात घातलेल्या जर्सीचा लिलाव होईल व त्यातून येणाऱ्या रक्कमेला गिव्ह इंडिया फाउंडेशनला देण्यात येईल. आरसीबी मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हॅशटॅग ‘माय कोव्हिड हिरोज’ आणि ‘रिअल चॅलेंजर्स’ ही मोहीम चालवत आहे. या मोहिमे अंतर्गत कोरोना संकटात समाजसेवा करणाऱ्या योद्ध्यांची कहानी दाखवली जात आहे.