एटीपी वेस्टर्न अॅण्ड साऊथर्न ओपन टेनिस स्पर्धेत जोकोविच चॅम्पियन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/novakcorona_b_20.jpg)
अव्वल रँकिंगवर विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने शनिवारी मध्यरात्री झालेल्या पुरुष एकेरी फायनल लढतीत मिलॉस राओनिचला पराभूत करीत एटीपी वेस्टर्न अॅण्ड साऊथर्न ओपन या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. या जेतेपदामुळे 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅमसाठी त्याने आत्मविश्वासही संपादन केला.
नोवाक जोकोविच याने मिलॉस राओनिचचे कडवे आव्हान 1-6, 6-3, 6-4 अशा फरकाने परतावून लावत झळाळता करंडक पटकावला. या दिग्गज टेनिसपटूने कारकीर्दीतील 80व्या जेतेपदावर नाव कोरले. या वर्षी त्याने 23 लढती जिंकल्या हे विशेष. तसेच मिलॉस राओनिचविरुद्ध त्याने 11 लढती जिंकण्यातही यश मिळवले. नोवाक जोकोविच याने 35व्या एटीपी मास्टर्स मालिका जिंकताना रफाएल नदालच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
अमेरिकन ओपन स्पर्धा आजपासून
कोरोनाला मागे टाकत अमेरिकन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे उद्यापासून आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी रॉजर फेडरर व रफाएल नदाल हे दोन प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नसल्यामुळे साहजिकच नोवाक जोकोविचकडे संभाव्य विजेता म्हणून बघितले जात आहे. ही स्पर्धा जिंकल्यास तो 18व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा मानकरी ठरील. आतापर्यंत रॉजर फेडररने 20 व रफाएल नदालने 19 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.