इंग्लंड आणि वेस्ट इंडीज पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/West-Indies-tour-of-England-2020.jpg)
लंडन : तब्बल चार महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा चौकार-षटकार पाहायला मिळणार आहेत. कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. खेळाडू जरी मैदानात असले, तरी हा सामना विनाप्रेक्षक असेल. इंग्लंडमधील साऊदम्पटनमध्ये हा सामना खेळवला जात आहे.
जगभरातील कोरोना संकटानंतर तब्बल 117 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होत आहे. जवळपास 46 वर्षानंतर ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना होऊ शकलेला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यासाठी प्रचंड खबरदारी घेण्यात आली आहे. टाळ्या शिट्या वाजवायला मैदानात प्रेक्षक उपस्थित नसतील, इतकंच काय एखादी विकेट घेतल्यानंतर खेळाडूंना एकमेकांची गळाभेटही घेता येणार नाही. आठवड्यातून दोन वेळा खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, शिवाय हॉटेलबाहेर खेळाडूंना जाता येणार नाही.
हा सामना केवळ क्रिकेटमधील रेकॉर्डमुळेच नव्हे तर त्याव्यतिरिक्त सर्व नियमांमुळेही हा सामना इतिहासात नोंदवला जाईल. विनाप्रेक्षक सामना, कोरोनाची सातत्याने चाचणी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम अशा सर्व नियमांमुळे भविष्यातील क्रिकेटचे सामने कसे असू शकतात, याबाबतची ही झलक असू शकते.