इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला तब्बल ९०० कोटींचा तोटा; २० टक्के कर्मचाऱ्यांची हकालपट्टी निश्चित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ECB-eingland.jpg)
लंडन – करोना व्हायरसमुळे अनेक कंपन्यांना जसा आर्थिक तोटा सहन करावा लागला तसाच फटका विविध क्रीडा संघटनांना देखील बसला आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जवळपास ४ ते ५ महिने क्रीडा स्पर्धा स्थगित केल्या होत्या. आता क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरी नियमीत वेळापत्रकानुसार होत नाहीत.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला ( ECB) करोना व्हायरसमुळे जवळ जवळ १० कोटी पाउंड म्हणजेच ९५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता बोर्डाने कर्मचारी कपात करण्याची योजना तयार केली आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर करोनाचा प्रभाव पुढील वर्षी देखील दिसला तर तोटा २० कोटी पाउंड म्हणजे १९ कोटींवर पोहोचू शकतो.
हॅरिसन यांनी बोर्डाच्या अर्थसंकल्पात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा अर्थ ईसीबी ६२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल. आम्ही कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहोत. ही कपात सध्याच्या क्षमतेच्या २० टक्के इतकी असेल, असे हॅरिसन म्हणाले.
करोना व्हायरस काळात क्रिकेट सुरू करणारा इंग्लंड हा पहिला देश होता. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेला सामना हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील करोना काळातील पहिला सामना होता. त्यानंतर पाकिस्तान आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी जैव सुरक्षिततेच कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळली आहे.
आर्थिक नुकसान झाले म्हणून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेणारा इंग्लंड हा पहिला देश नाही. या आधी ऑस्ट्रेलियाने जून महिन्यात ४० जणांना काढून टाकले होते. यात प्रशिक्षक जस्टिन लॅगर यांच्या टीमधील सदस्य ग्रीम हिक यांचा देखील समावेश होता. इतक नव्हे तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २००हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार निम्मा केला आहे.