आयपीएलच्या प्रायोजकासाठी पतंजली, ॲमेझॉन, फँटसी स्पोर्ट्स स्पर्धेत
नवी दिल्ली – भारतात चिनी वस्तूंच्या आणि कंपन्यांच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेत नाईलाजाने सहभागी होत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2020च्या आयपीएलची प्रायोजक असलेल्या ‘व्हिवो’ कंपनी सोबतचा करार रद्द केला आहे. व्हिवो ही चीनची फार मोठी मोबाईल कंपनी आहे. व्हिवो बाहेर गेल्यावर आता 2020च्या आयपीएलचे प्रायोजक बनण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली स्पर्धेत उतरली आहे. त्यासोबतच ॲमेझॉन, फँटसी स्पोर्ट्स कंपनी, ड्रीम 11 आणि टीम इंडियाची जर्सी प्रायोजक आणि ऑनलाईन लर्निंग कंपनी “बायजू” हेदेखील शर्यतीत आहेत.
आता लवकरच बीसीसीआय आयपीएल 2020च्या प्रायोजक पदासाठी लिलाव करणार आहे. या प्रायोजक पदासाठी बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली उत्सुक आहे. पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. त्यांनी सांगितले की, आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवून पतंजली ब्रँडला जागतिक व्यासपीठावर नेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत. व्हिवोकडून बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये मिळत होते. आता पतंजली किती पैसे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पतंजली सोबतच आयपीएलचे प्रायोजकत्व मिळविण्यासाठी ॲमेझॉन, फँटसी स्पोर्ट्स, ड्रीम 11 आणि बायजू या कंपन्यादेखील शर्यतीत आहेत.