breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

सागरी पाणघोडय़ाच्या दातांची तस्करी उघड; मुद्देमालासह तिघांना अटक

कराड |

सागरी सस्तन प्राणी असलेल्या दुर्मीळ अशा पाणघोडा, समुद्रीगाय व समुद्राश्व म्हणून मराठीत संबोधल्या जाणाऱ्या वालरसचे (WALRUS)) दात (IVORY TUSK) व मोटारकार जप्त करताना तिघांना अटक करण्यात आली आहे. वालरसचे दात हस्तिदंतापेक्षाही मोठे आणि सुळे असतात. पश्चिम घाट क्षेत्रात वन्यजीव अपराधाचे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात संबंधित यंत्रणेला यश येत असतानाच त्यांच्याकडून वालरस या सागरी प्राण्याच्या दातांची तस्करी तीही वनक्षेत्रातच उघड झाल्याने ही एक मोठी साखळी असण्याचा कयास बांधून अधिक तपास करण्यात येत आहे. त्यासाठी परराज्यातही पथके रवाना करण्यात आली आहेत.

अटक केलेल्या तिघांकडून वन्यजीवांचे आणखी काही अवयव मिळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कराडमधून सराफ व त्याच्या साथीदाराकडून वाघ व बिबटय़ाच्या नख्या हस्तगत करताना या दोघाही तरुणांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच दुर्मीळ अशा पाणघोडय़ाच्या (वालरस) दातांची तस्करी उघड झाली आहे. वालरसच्या दातांची तस्करी उघड होण्याची बहुदा ही पहिलीच घटना आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वनखाते व पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथे सापळा रचून केलेल्या संयुक्त कारवाईत वालरस या समुद्री सस्तन प्राण्याचे दात हस्तगत करण्यात आले.

खबरीकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई अतिशय दक्षपणे करण्यात आली. त्यात उत्तर गोव्यातील एक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघे अशा तिघांना अटक करताना त्यांच्याकडील चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद नुमान यासिन नाईक (४१, रा.कोनाडी, पेरमेम, उत्तर गोवा),  हेमंत सुरेश कांडर (३८, रा. बावशी, कणकवली, सिंधुदुर्ग), राजन दयाळ पांगे (५८ रा.परवाडी, मालवण, सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, सातारचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबळे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button