राष्ट्रवादीला धक्का: मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत देवदत्त निकम विजयी
महाविकास आघाडी विजयी, पण दिलीप वळसे-पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग

पुणे : पुणे जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व राखले असताना मंचर- आंबेगावमध्ये मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते देवदत्त निकम या निवडणुकीत विजयी झाले असून, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या वर्चस्वाला सुरूंग लागला आहे.
पुणे जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. यामध्ये हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मतदान झाल्यावरच मतमोजणी करण्यात आली होती. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची महाविकास आघाडी निवडणूकला सामोरे गेली आहे. या आघाडीच्या विरोधात शिवसेना भाजपा व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम अशी येथे तिरंगी लढत झाली. संपूर्ण राज्याततील सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे येथील निवडणूक निकाला विषयी लक्ष होते.
महाविकास आघाडी विजयी पण…
आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम हेही निवडून आले आहेत. माजी सभापती निकम यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. मंचर बाजार समितीच्या १८ जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना-भाजप युतीने आपला पॅनेल उभा केला होता. मात्र, युतीच्या पॅनेलला पराभावाचा सामना करावा लागला आहे. बाजार समितीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या हेात्या. उर्वरीत पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यातील १४ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला असून बंडखोर निकम हे निवडून आले आहेत.