ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीत विजयी

सोनाक्षीची खास पोस्ट, लिहिलं की 'विजयी हास्य'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाला आव्हान देत २०२४ च्या लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व कायम राखल्याचं पाहायला मिळालं. राज्यात तृणमूल काँग्रेसनं सर्वाधिक २९ जागा जिंकल्या. त्यांच्या जागांमध्ये २०१९ च्या तुलनेत सात जागांची भरच पडली. आसनसोलमधून अभिनेते व ‘तृणमूल’चे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या विजयानंतर त्यांची लेक सोनाक्षी सिन्हा हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांच्या विजयानंतर सोनाक्षीनं सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत तिनं आसनसोलच्या जनतेचे आभार मानले आहेत. तर दुसऱ्या एका स्टोरीत तिनं शत्रुघ्न सिन्हा यांचा एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्यात.
पहिला फोटो शेअर करत सोनाक्षीनं ‘धन्यवाद आसनसोल’ असं म्हटलंय. तर दुसरा फोटो खास आहे. या फोटोत शत्रुघ्न सिन्हा विजयचं प्रमाणपत्र हातात पकडून पोज देताना दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आनंद पाहून सोनाक्षीनं लिहिलं की, ‘विजयी हास्य’.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यांनी बिहारच्या पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ साली विजय मिळवला होता. मात्र भाजप नेतृत्वावर त्यांनी अनेकदा टीका केली होती. त्यामुळं नंतर भाजपनं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यानंतर २०१९मध्ये सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमधल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या कामाचं कौतुक झालं. तिनं साकारलेली फरीदन प्रेक्षकांना आवडली. आई आणि मुलगी अशा दोन भूमिकांमध्ये ती या सीरिजमध्ये दिसली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही तिच्या अभिनयकौशल्याचं कौतुक केलं. या सीरिजच्या पुढच्या सीझनचीही घोषणा झाली आहे. त्याबद्दल सोनाक्षी म्हणाली, ‘मी आतापर्यंत केलेल्या भूमिका मनापासून मला आवडल्या, म्हणून मी केल्या आहेत. ‘हीरामंडी’मधली फरीदन ही भूमिकाही अशीच आहे. तिच्यात आणि माझ्यात काहीच साम्य नाही. मात्र, कलाकार म्हणून तुम्ही जे काम करताय ते प्रेक्षकांनाही तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत वाटायला हवं. भूमिका करताना मी या गोष्टीची काळजी घेते.’

या सीरिजपूर्वी सोनाक्षीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्याबद्दल ती म्हणाली, ‘तुमचे चित्रपट चालले नाहीत, तरी अपयशानं हार न मानता तुम्ही पुढचं काम अधिक चांगलं कसं होईल याला महत्त्व द्यायला हवं. मी नेहमीच चांगल्या भूमिकांच्या शोधात असते. कलाकारानं सुसंगत कसं राहावं आणि भूमिकांची निवड करताना काय काळजी घ्यावी, याचे धडे मला वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून नेहमीच मिळाले आहेत. मी ज्या भूमिका साकारल्या त्या भूमिकांनी मला अभिनेत्री म्हणून घडवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button