breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मला मुख्यमंत्री किंवा इतर कोणाला सांगायची गरज वाटत नाही,” जितेंद्र आव्हाड रोखठोकच बोलले

मुंबई |

दिवा येथील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लिमविरोधी आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले. पण, त्यात कणा नसलेला हे पहिले आयुक्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. “इथे खूप आयुक्त होऊन गेले. जैस्वाल कसे वागायचे हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यांच्यानंतर हे आयुक्त येणं आणि त्यांचं वागण दृष्टीत येतं. जैस्वाल संपूर्ण शहर सुंदर करुन गेले. यांनी ठाण्याचे किती दौरे केले सांगावं. कळव्याची खाडी पार करुन कधी गेलेत का विचारा? आतापर्यंत बोलत नव्हतो पण कार्यकर्त्याचा अपमान होत असेल तर मी मंत्री आहे कधीच विसरुन जाईन,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

“मी सत्तेत आहे म्हणून काय अन्याय सहन करेन. मला मुख्यमंत्री किंवा इतर कोणाला सांगायची गरज वाटत नाही. माझं आयुक्तांबद्दल जे मत आहे ते आज पहिल्यांदा प्रदर्शित केलं आहे. मी आयुक्त हटाव वैगेरे मागणीच्या मागे लागणार नाही. आयुक्तांचं हे वागणं योग्य नाही. त्यांनी पक्षपाती असू नये,” असं आव्हाड म्हणाले. “प्रशासन म्हणजे आघाडी नाही. आम्ही विरोधी पक्षात असून विरोधी पक्षाचं काम करणार. क्लस्टरच्या वेळी मी माझ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केलं होतं. आंदोलनात पक्ष पहायचा नसतो तर जनतेचं दु:ख पहायचं असतं. हायवेवर २५ हजार लोकांना घेऊन क्लस्टरचं पहिलं आंदोलन जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. आंदोलन हे कोणाविरोधात नसतं,” असं यावेळी ते म्हणाले.

“एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील त्या अधिकाऱ्याला पदावरून बाजूला करून त्याची चौकशी करण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. पण, तसे होत नाही म्हणून आयुक्तांविरोधात हे आंदोलन आहे. सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन नाही,” असेही ते म्हणाले. हा लढा प्रशासनाविरोधात असून तो महापौर किंवा शिवसेनेविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हा लढा प्रशासनाविरोधात होता. महापौर किंवा शिवसेनेविरोधात नव्हता. कोविडच्या इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्यानंतरही आयुक्तांनी काही केलं नाही. जुने आयुक्त मैदानात उतरून लोकांच्या समस्या सोडवायचे. हे किती वेळा मुंब्रा, दलित वस्त्यांमध्ये गेले? हा आयुक्त मुस्लिम आणि दलितविरोधी असल्याचं माझं स्पष्ट मत आहे,” असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला.

  • …तर मला स्वतःला रस्त्यावर उतरावं लागेल

एका पक्षाची बाजू घेऊन महापालिका चालवू शकतो असे आयुक्तांना वाटत असेल तर मला स्वतःला रस्त्यावर उतरून आम्ही काय आहोत हे दाखवून द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. हे आयुक्त माझ्या बेरजेत आणि वजबाकीतही नाही. तसेच एमएमआरडीएची घर गरिबांसाठी होती, त्यामुळे त्यांचा शाप लागेल, असेही म्हणाले.

  • महापौरांना दिला इशारा

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या फेसबुक पोस्टवरुन आव्हाडांनी नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? असं म्हणत जखमेवर बोट ठेवलं. “जे एकनिष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठेबद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले, क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आले, या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका”, असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावले.

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करणं, उद्धव ठाकरेंना कार्यकर्ता तुटू देऊ नका समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं, नजीबने त्यांना लपलेल्या स्थितीतील बाहेर आणणं, क्षणभर विश्रांतीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर उभं करणं आणि त्यांनी त्यांना माफ करणं याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. निष्ठा वैगेरे मला शिकवू नका. एका खांबावर मी ३५ वर्ष उभा असून अजिबात डगमगलेला नाही,” असं त्यांनी सांगितलं.

  • “आघाडीबाबत मी निर्णय घेणार”

“गटनेते अनावधानेने बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने असून आघाडीच्या बाजूनेच लढेल. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असतं. ठाण्याचा संपर्कमंत्री जितेंद्र आव्हाड असून आघाडी तुटेल असं आमच्याकडून काही केलं जाणार नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असं माझं मत आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे, त्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button